जळगाव,(विशेष प्रतिनधी)-कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीही बहुतांश ग्रामसेवकांची हेडकॉर्टरला गैरहजेरी या मथळ्याखाली जिल्ह्याची वस्तुनिष्ठ परिस्थितीचे वृत्त “दैनिक नजरकैद” ने आज प्रकाशित केल्यावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी तत्परता दाखवत ग्रामसेवकांसह ग्रामस्तरीय अधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश आज दि 18 रोजी काढले.जिल्ह्याधिकाऱ्यांच्या या तत्परतेमुळे जिल्ह्याच्या गतिमान प्रशासनाचा प्रत्यय आज जिल्हावासीयांना अनुभवायला मिळाला.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या सर्व संबंधित स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांचे संस्थात्मक विलगीकरण शासन निर्देश नुसार योग्य पद्धतीने होणे आवश्यक असून संबंधितांना कोविड- 19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोशल डिस्टन्स,माक्सचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, इतर जनमानसात न मिसळणे या बाबत सूचना निर्देश देण्याकरिता व संस्थात्मक विलगीकरण प्रभावीपणे राबविण्याकामी सर्व ग्रामस्तरीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.त्यामुळे सर्व ग्रामस्तरीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
तसेच यापुढे सदर ग्रामस्तरीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी/मुख्यालयी हजर राहत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास अशा तक्रारींचे शहानिशा केल्या नंतर सदर तक्रारीबाबत तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध नमूद कायद्यातील तरतुदी नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र होईल असेही आदेशात नमूद आहे.