जळगावचे चित्रकार आनंद पाटील यांची अनुभूति
मुंबई – जळगावच्या गांधीतीर्थ संग्रहालयावर आधारीत चित्रांचे, पेंटिंग्जचे प्रदर्शन अत्यंत कलात्मक, सुंदर आहे. निसर्गाशी वास्तू कशी समरुप होते याची अनुभूती या चित्रप्रदर्शनाच्या अवलोकनातून आली असे मत ज्येष्ठ कॉपीरायटर आनंद गुप्ते, यांनी व्यक्त केले. त्यांच्याहस्ते मुंबई येथील आर्ट प्लाझा गॅलरीत हे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधीजींच्या विचारांची जवळीकता निर्माण करणारे चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ साकारले आहे. हे प्रदर्शन 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे अधिव्याख्याता जॉन ड्गल्स हे उपस्थित होते.
जळगाव येथील जैन इरिगेशनच्या आर्ट विभागातील सहकारी आनंद पाटील यांनी हे चित्रप्रदर्शन साकारले आहे. प्रदर्शनात एकुण 18 चित्रे प्रदर्शनस्थळी लावण्यात आली आहेत. जळगाव येथील जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या गांधीतीर्थ हे गांधी विचार प्रचार-प्रसाराचे केंद्र आहे. पर्यावरण, अहिंसा, शांती, प्रेम यासोबत वैश्विक समाज निर्मीती व्हावी; यासाठी तरूणांमध्ये गांधी विचारांचे संस्कार, आचरण व्हावे, यासाठी गांधीतीर्थ विविध उपक्रम राबवित असते. गांधी विचारांनी प्रेरीत होऊन आर्टीस्ट आनंद पाटील यांनी ही चित्रे साकारली आहेत.
चित्रातून गांधीतीर्थ अनुभवता यावे यासाठी गांधीतीर्थच्या त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन श्री.पाटील यांनी चित्रे रेखाटली आहेत. 21 वर्षापासून आनंद पाटील कलाक्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी अनेकविध विषयांवर संवेदनात्मक चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. पाच गृप, चार सोलो प्रदर्शन यासह त्यांच्या 75 च्या वर पेटिंग संग्रहीत आहेत. आर्ट प्लाझा येथील चित्रप्रदर्शनाला कलारसिकांनी भेट द्यावी व गांधीतीर्थ समजून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.














