धुळे – शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड येथे एका ढाब्यावर उभ्या कंटेनरसह 27 लाखांचा गुटखा जप्त केला. विविध पार्सल वस्तूंच्या आड या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाडाखेड गांवाजवळील हरीयाणा मेवात ढाब्यावर एक संशयीत ट्रक उभा होता, ट्रकमध्ये तंबाखुजन्य पदार्थ असण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यावरुन सपोनि अभिषेक पाटील, योगेश ढिकले, पोना संजय जाधव, पोकॉ. योगेश मोरे, पोकॉ महाले, पोकॉ योगेश दाभाडे यांनी हरीयाणा मेवात ढाबा, हाडाखेड येथे जावून तपासणी केली असता ट्रक कंटेनर क्र.आरजे-14 जिएच 3946 च्या चालकाची विचारपूस केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने ट्रक पोलीस ठाण्यास आणला व मालाची तपासणी केली असता ट्रकमध्ये विविध वस्तुचे पार्सलच्या आडोश्याला सुगंधीत जाफरानी तंबाखु जर्दा व सुगंधीत गुटकाजन्य पानमसाला मोठया प्रमाणात आढळून आला. त्यामुळे ही माहीती पुढील कारवाई करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे येथील अधिकार्यांना बोलावून घेण्यात आले.
त्यानुसार सहा.अन्न सुरक्षा अधिकारी हे त्यांचे पथकासह पोलीस ठाण्यात आले व त्यांनी संपूर्ण मालाची तपासणी केली असता ट्रकमध्ये 7 लाख 16 हजार 448 रूपये किमतीचा गुटखा (प्रिमियम राजनिवास सुगंधीत पान मसाल्याचे पांढ-या रंगाच्या 17 गोण्या व एनपी-1 जाफरानी जर्दा 40 गोण्या) मिळुन आला. गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आंनद पवार यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सहोनसिंह ब्रिजलाल (वय 35 रा.गोटाणी ना खरजा जि.बुलंद उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध भादवि कलम 328, 272, 273, 188, अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 26(2),27,30(2)(र)सह कलम 26(2)(र्ळीं) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि अभिषेक पाटील हे पुढील तपास करीत आहे.
ही कारवाई ही पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक श्री.भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री माने यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांचे मदतीने करण्यात आली आहे.