जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे दि. २० मार्च पासून पूर्णतः कोविड करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केले. त्यामुळे रुग्णालयात शनिवारी २० मार्च रोजी पहिल्या टप्प्यात १८० ऑक्सिजन बेड तयार झाले असून त्यातील १६० खाटांवर रुग्ण दाखल झाले आहे. तसेच अपघात विभाग हा नेत्रकक्ष (सी १) येथे सुरु करण्यात आला असून गेट नं. २ मधून प्रवेश देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी २२ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी जाहीर केले आहे. तर कोरोना विरहित इतर रुग्ण हे डॉ. उल्हास पाटील रुग्णालय, शाहू महाराज रुग्णालय अथवा म. फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ शकणार आहेत. शनिवारी शासकीय रुग्णालयातील वॊर्ड क्रमांक ७,८,९ हे सुरु करण्यात आले असून एकूण १८० खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तर त्यात १६० खाटांवर उपचारासाठी रुग्ण दाखल झाले आहेत.
तसेच, अपघात, हाणामारी, विषप्राशन आदी महत्वाच्या आजारांवर तातडीने उपचार होण्यासाठी नेत्रकक्षात (सी १) सुरु करण्यात आला आहे. १२ वाजेपासून रुग्ण या विभागात घेणे सुरु झाले असून त्यामुळे तातडीच्या उपचारांसाठी वैद्यकीय सेवा सुरु झाले आहे. त्यासाठी गेट नं . २ मधून प्रवेश दिला जात आहे. तर गेट न. १ मधून कोरोना रुग्णांना दाखल करणे सुरु झाले आहे. तसेच ओपीडी पूर्णतः बंद करण्यात आली आहे.















