मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अजित पवार यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे असे गृहमंत्रिपद सोपवले जाणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांच्याकडे चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आली आहे. सर्वप्रथम नोव्हेंबर २०१०, त्यानंतर ऑक्टोबर २०१२ आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. गेल्या महिन्यात जमतेम ८० तासांसाठीच अजित पवार यांच्याकडे हे पद होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून अजित पवार भाजपसोबत गेले होते आणि २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि २६ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पाठोपाठ सरकार अल्पमतात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.















