मुंबई – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राउत मुंबईत जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, संजय राउत या कार्यक्रमात एनआरसी आणि सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) विरोधात भाषण देतील. जमात-ए-इस्लामीच्या मुंबईतील अध्यक्षांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या संघटनेकडून शनिवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांनीच संजय राउत यांच्या उपस्थितीबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे.
जमात-ए-इस्लामी हिंद आणि नागरी हक्क संरक्षण मंचकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये संजय राउत यांच्यासह माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील, ज्येष्ठ वकील युसूफ मुछावाला यांची उपस्थिती राहणार आहे. हे सर्वच मान्यवर एनआरसी आणि नागरिकत्व कायद्यावर आपले मत व्यक्त करतील. उल्लेखनीय बाब म्हणजे, सीएए कायद्याला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला. तर राज्यसभेत त्यास विरोध केला. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करायचा की नाही यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्पष्ट करणार असे सांगितले आहे.