पाचोरा,(किशोर रायसाकडा) –
विधी सेवा समिती ,दिवाणी फौजदारी न्यायालय व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ न्यायालयीन यंत्रणेच्या आदेशानुसार रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी विधी सेवा महा शिबिर ,शासकीय सेवा योजना महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती न्या. जी बी औंधकर , वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयात दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी न्यायमूर्ती जी बी ओंधकर यांनी पत्रकार परिषदेत शासनाच्या शासन आपल्या दारी योजनेच्या धर्तीवर न्यायालय आपल्या दारी या संकल्पने नुसार विधी सेवा महाशिबिर ,शासकीय सेवा योजना महामेळावा आयोजना संदर्भात माहिती दिली.
याप्रसंगी न्या. निमसे , न्या. बोरा , ॲड प्रवीण पाटील यांचेसह वकील बांधव उपस्थित होते.
दिनांक 19 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजे दरम्यान अंतुर्ली शिवारातील निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये महाशिबिर होणार असून याप्रसंगी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती , जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश , उपस्थित राहणार असून शासनाच्या महसूल , वीज वितरण , कृषी , पालिका , परिवहन ,आरोग्य यासह सर्वच शासकीय विभागाच्या विविध लाभार्थी योजना , त्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे , मिळणारा लाभ , लाभार्थ्यां समोरील समस्या या संदर्भात महत्वपूर्ण माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे.शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे लाभार्थी , जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक , प्रांताधिकारी , तहसीलदार , आर टी ओ ,गटविकास अधिकारी , मुख्याधिकारी ,गट शिक्षणाधिकारी , जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे न्यायाधीश या महाशिबिरास उपस्थित राहणार आहेत.
शासनाच्या योजनांचा प्रत्येक लाभार्थ्यास लाभ मिळावा. कोणीही वंचित राहू नये या उदात्त हेतूने हा विधी सेवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.जळगाव जिल्ह्यातील हे पहिलेच महाशिबिर असून त्याचा लाभार्थी , नागरीक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.