नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात २०१५ नंतर दोनदा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ यंदाच्या पथसंचलनात दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. यंदाचा महाराष्ट्राचा चित्ररथ हा मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या संकल्पनेवर साकारण्यात येणार होता.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी निवडक राज्यांचे चित्ररथ दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनामध्ये सहभागी होत असतात. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ या पथसंचलनामध्ये सहभागी होत होता. गेल्या पाच वर्षांत दोनदा महाराष्ट्राच्या चित्ररथानं पहिला क्रमांक मिळवला होता. या वर्षी मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळं आता यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.