पारनेर – तेलंगणाच्या धर्तीवर राज्यात लैंगिक अत्याचाराविरुद्ध कठोर कायदा करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी ठाकरे यांच्या सूचनेनुसार रविवारी हजारे यांची भेट घेऊन ही माहिती दिली.
असा कठोर कायदा करावा, या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी २० डिसेंबरपासून मौन सुरू केले होते. या आंदोलनास सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष औटी यांना हजारे यांच्याशी चर्चा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औटी यांनी रविवारी दुपारी संत यादवबाबा मंदिरातील खोलीत हजारे यांच्याशी चर्चा केली.
अण्णा हजारे यांची भूमिका समजावून घेतल्यानंतर औटी यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. तेलंगणात बलात्कार-हत्येतील दोषींना २१ दिवसांत शिक्षा करण्यासंदर्भात केलेल्या कायद्याच्या धर्तीवर सक्षम कायदा राज्यात लागू करण्याचे ठाकरे यांनी मान्य केल्याचे औटी यांनी सांगितले.