बारामती- महाविकास आघाडीचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीच्या शिर्सुफळ येथे आयोजित सभेत मतदारांशी संवाद साधला.
आज बऱ्याच दिवसांतून मी आपल्या गावी आलोय. मला आठवतंय १९६५ साली मी बारामती तालुक्यामध्ये समाजकारणाला सुरुवात केली. अनेकदा शिर्सुफळ, कटफळ, उंदवडी, गोजुबावी अशी अनेक गावे आहेत ज्यांचा उल्लेख या ठिकाणी करणे गरजेचे आहे. या सगळ्या गावांमध्ये माझं जाणं-येणं होतं. या भागाचं वैशिष्ट्य काय होतं? दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची अडचण, सगळ्या दृष्टीने कमतरता. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही लोकांनी ऑस्ट्रेलियन मिशनरी नावाच्या संस्थेची मदत घेतली आणि त्यांच्याकडून गहू आणला, त्याला सरकारची मदत नव्हती. लोकांनी कामाला यावं आणि दिवसाच्या मजुरीमध्ये दोन-तीन किलो गहू घेऊन जावं, छोटे-मोठे बंधारे बांधले.
या जिरायत भागामध्ये जवळपास ३०० पेक्षा अधिक बंधारे छोटे-मोठे बांधले आणि थोडी बहुत पाण्याची सोय केली. नंतर तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि विधानसभेत गेल्यानंतर छोटी का होईना पण एखादी योजना या ठिकाणी करता येईल का? हा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जनाई- शिरसाईचा जन्म झाला. मला माहित नाही जनाई- शिरसाईचे पाणी सगळ्यांना येतं असं मी म्हणत नाही. पण काहीतरी क्षेत्राला पाणी येत असेल. थोडं बहुत का होईना पण पाणी या ठिकाणी यायला लागलं आणि चित्र हळूहळू बदलायला लागलं.
प्रचार त्या ठिकाणी केला की शेतीला जोडधंदा असला पाहिजे म्हणून दुधाचा धंदा. त्यासाठी संकरित गाई ही कल्पना या भागात राबवली. मला आज माहिती नाही पण शिर्सुफळला दुधाचा कलेक्शन किती होत असेल? दूध वाढायला लागलं. आम्ही २०० लिटर वरून संघाची सुरुवात केली आणि नंतर ते कलेक्शन १ लाख लिटरवर गेलं. त्या काळामध्ये आम्ही हे दूध राज्य सरकारची योजना होती पुण्याला तिथे नेऊन पोचवायला लागलो. पण नंतर हा विचार केला या दुधावर प्रक्रिया करणारी कारखानदारी बारामतीला का काढायची नाही? आणि अमेरिकेच्या एका कंपनीशी वाटाघाटी केल्या आणि ती कंपनी बारामतीत आणली तिचं नाव डायनॅमिक्स. या कंपनीला ८ लाख लिटर दूध आजूबाजूच्या सगळ्या भागातून येतं आणि त्या दुधावर प्रक्रिया करणारी कारखानदारी आपण त्या ठिकाणी सुरू केली. सांगायचं तात्पर्य आहे की, शेती संकटात असेल तर तिथे काही ना काहीतरी दुसरा जोडधंदा असला पाहिजे.
एक काळ असा होता की बारामतीच्या बाजारपेठेमध्ये जो माल यायचा, धान्य यायचं तो गाडीतून उचलून गोडाऊनमध्ये टाकणं हे काम करणारे जास्तीत जास्त लोक हे चौधरवाडी, तांदुळवाडी या भागातले असायचे. आज मी त्या ठिकाणी बघितलं सगळ्यांची घरं स्लॅबची आहेत. घरं चांगली आहेत परिस्थिती बदलली. मी त्यांना विचारलं हे कशामुळे झालं? त्यांनी सांगितलं की तुम्ही एमआयडीसी काढली आणि त्याचा परिणाम आज हजारो लोक त्या ठिकाणी काम करतात. ८ ते ९ हजार महिला काम करतात. प्रपंचाला एक आधार या निमित्ताने झाला. राजकारण करायचं असतं ते निव्वळ राजकारणासाठी, निवडणुकीसाठी, सत्तेसाठी नव्हे. त्या राजकारणाचा उपयोग लोकांच्या जीवनात काही ना काही तरी बदल झाला तर त्या राजकारणाला अर्थ आहे. ते काम करण्याबद्दलची भूमिका घेतली आणि त्याचे परिणाम आज बारामतीचे नाव बारामतीचा चेहरा बदलला.
शिक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. शिर्सुफळला हायस्कूल काढलं. आणखी काही ठिकाणी शाळा काढल्या आणि बारामतीला विद्या प्रतिष्ठान सारखी संस्था जिथे ३१ हजार मुलं-मुली शिकतात आणि कुठेही देणगी घेतली जात नाही. शिक्षणाचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकरण हे बारामतीत कुठेही नाही. कदाचित तुम्हाला माहीत असेल की, शारदानगर नावाचा भाग आहे माळेगावच्या अलीकडे आज त्या ठिकाणी ९ हजार मुली शिकतात. माळेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आणि बाकीच्या संस्था आपण उभ्या केल्या आणि बारामती तालुका पुण्यानंतर शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र झाले. कारण आमची अपेक्षा ही आहे की, मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जावं आणि आपला घर, आपला प्रपंच हा सुधारावा या पद्धतीचे राजकारण हे या भागामध्ये केलं गेलं आणि ते यशस्वी झालं त्याचे कारण तुम्ही लोक आहात. तुम्ही लोकांनी कधी ना म्हटलं नाही.
मी अनेक निवडणुका केल्या मला आठवतंय की मी आणि रघुनाथ पाटील येत असो इथे आजूबाजूच्या गावात लोकांच्या जात असो त्यांनी आम्हाला नेहमी साथ दिली. रघुनाथ पाटील सभापती झाले नंतरची पिढी सतीश आबा या ठिकाणी आहेत. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत आज आपण इथलं काम वाढवत राहिलो त्याचा काही ना काहीतरी फायदा या भागामध्ये झाला. नंतरच्या काळात माझ्यावर जबाबदाऱ्या वाढल्या आणि मी बारामतीच्या कामातून बाजूला झालो. तुम्ही लोकांनी मला महाराष्ट्राचा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा- चारदा मुख्यमंत्री केलं. त्यामुळे सहाजिकच आहे इथं कोणतरी बघितलं पाहिजे. १९६७ साली तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं, २५ वर्ष मी इथलं काम केलं आणि नंतर महाराष्ट्राच्या कामाला गेल्यानंतर पुढची कामं सगळी सत्ता ही अजितदादांच्या हातात दिली. निर्णय तुम्ही घ्यायचा, कार्यक्रम तुम्ही घ्यायचे, निवडणुका तुम्ही ठरवायच्या. कुठे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, साखर कारखाना असेल, दूध संघ असेल नेमणुका तुम्ही करायच्या. त्यांनी २५ ते ३० वर्षे हे काम या ठिकाणी केलं त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. मी सुरुवातीच्या २५- ३० वर्ष केलं. नंतरच्या काळातील ३० वर्षांतील काम अजितदादांनी केलं. आता पुढची तयारी करायची की नाही? आता पुढची तयारी करायची असेल तर पुढच्या ३० वर्षांचे काम करणारे नेतृत्व इथे तयार करण्याची आवश्यकता आहे. संधी ही सगळ्यांना द्यायची असते. आपण कधी कुणाला दिली नाही असं कधी केलं नाही. पण मी सगळं घेणार असं मी म्हटलं तर लोक बोलणार नाहीत पण लोक म्हणतील हे काही खरं नाही. आणखी काही म्हणतील मी काही बोलत नाही. त्यामधून आम्ही तुम्हाला नवीन नेतृत्व या ठिकाणी तयार करायचं या हेतूने आज या ठिकाणी या तरुणाची उमेदवारी दिलेली आहे.
पहिल्यापासून या भागाने मला कधी नाही म्हटलं नाही. अलीकडच्या काळामध्ये मी मत मागायला सुद्धा आलो नाही पण तुम्ही द्यायच्या बाबतीत कधी काटकसर केली नाही. आज कुठेही गेलो तर बाहेर बारामतीची चर्चा होते. आनंद आहे की, तुम्हा लोकांचा नावलौकिक महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेला. त्या पार्श्वभूमीवर पुढचा नेतृत्व आणि हे काम असेच चालू ठेवायचे असेल तर काळ बदलला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण कमी जास्त असलं तर चालायचं. आता उच्चशिक्षित लोक लागतात, अनेक भाषेत बोलावं लागतं. ते बोलण्यासंबंधी ज्ञान असायला पाहिजे, समाजातल्या प्रश्नांचा अभ्यास पाहिजे, कारखानदारीचा अभ्यास पाहिजे आणि या कारखानदारीमधून अधिक हातांना काम आणि अधिक संपत्ती देशाची हे केलं पाहिजे. आज आपण एक एमआयडीसी काढली. तुम्हाला जाताना दिसत असेल पाच-पन्नास छोटे-मोठे कारखाने आज त्या ठिकाणी उभे राहिले आणि काही हजार लोकांना काम मिळालं, देशाच्या संपत्तीत भर पडली. याच कामाला गती द्यायची असेल तर जाणकार आणि कष्ट करणारा प्रतिनिधी हा तयार केला पाहिजे त्यादृष्टीने युगेंद्रची निवड या ठिकाणी केली. त्यांचे शिक्षण इथे झालं, त्यांचे शिक्षण अमेरिकेत झालं. इथं आल्यानंतर साखर कारखाना चालवायची जबाबदारी त्यांनी घेतली. ऊसाची शेती आणि साखर कारखानदारी याच्याशी जवळीक त्यांनी निर्माण केली. आज आम्हा सगळ्यांची सूचना होती की, पुढचं इथलं काम करण्याचे नेतृत्व करण्यासाठी तुम्ही तयारी दाखवली पाहिजे. मला आनंद आहे की, ही जबाबदारी घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. आता काम तुमचं आहे. तुम्ही आतापर्यंत माझी निवडणूक असो, अजित दादांची निवडणूक असो, सुप्रियाताईंची निवडणूक असो तुम्ही कधीही नकार दिला नाही, तुम्ही कधीही नाही म्हणलं नाही, तुम्ही कधीही मतं देताना कमतरता दाखवली नाही. कालची निवडणूक लोकसभेची थोडी अडचणीची होती, कौटुंबिक अडचणीची होती. तरीही सुप्रियाला शिर्सुफळ असेल, पारवाडी असेल, कटफळ असेल, उंदवडी असेल या सबंध जिरायत भागामध्ये फार मोठ्या मतांनी तुम्ही विजयी केलं आणि आज देशाच्या पार्लमेंटमध्ये पाठवलं. माझं आग्रहाचं तुम्हाला सांगणं हे आहे की, तुम्ही जो आतापर्यंत तुमच्या गावातला, तुमच्या भागाचा लौकिक होता तोच युगेंद्रच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट कराल. खूण त्यांची तुम्हाला ठाऊक आहे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही खूण आहे आणि ते काम तुम्ही करावं.
२० तारीख आहे मतदानाची, १९ आणि १८ कामाची आहे बाकीच्या त्याच्या आधीचे दिवस आपल्या हातात आहेत. त्यामध्ये या सगळ्या दिवसांचा उपयोग तुम्ही घराघरात ही नवीन खूण सांगणं, ती गिरवून घेणं आणि त्यावर मतदान होईल याची काळजी करा. मी आज या ठिकाणी आहे उद्याच्या १८ तारखेला बारामतीला शेवटची सभा ही घ्यायला येईन. उद्यापासून माझा दौरा महाराष्ट्रात आहे. उद्याच्याला पहिली सभा मी स्वतः, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आमच्या तिघांची जाहीर सभा उद्या मुंबईत आहे. ती मुंबईची सभा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी नागपूरला जाणार. नागपूर पासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण हे करून शेवटी बारामतीला येणार आहे. त्यामुळे मधल्या काळात मी अजिबात इथे येऊ शकत नाही. कारण सबंध राज्याची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे. लोकांची इच्छा आहे की, सगळीकडे यावं. सगळीकडे येणं शक्य होत नाही, जेवढं जाणं शक्य होईल तेवढं मी जाईन. पण या सगळ्या काळामध्ये इथल्या निवडणुकीचे काम तुम्ही तुमच्या हातात घ्या, तुम्ही सांभाळा, लक्ष ठेवा आणि युगेंद्रचं काम हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल कसं? याची काळजी घ्या.