मुंबई – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत संभाजीराजे यांनी गेल्या दोन वर्षांपासून रायगड प्राधिकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजे यांना संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
असंच काम होणार असेल तर या जबाबदारीमधून मला मुक्त करा
‘किल्ले रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे. मागच्या वेळी सरकारने रायगड संवर्धनासाठी 706 कोटी रुपये दिले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत रायगड संवर्धनाचे एक टक्काही काम झाले नाही. महाराजांपेक्षा मला कोणी मोठं नाही. म्हणून या कामात काही चूक व्हायला नको. वंशज म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मी आधी पासून आवाज उठवला आहे. पण असंच काम होणार असेल तर या जबाबदारीमधून मला मुक्त करा,’ अशी मागणी संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
दरम्यान, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कारभारात गेल्या 2 वर्षांपासून ठेकेदार भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार करत असल्यामुळे रायगड किल्ला प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पण राज्यात नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्राधिकरणाच्या सर्व कारभाराबद्दल चर्चा करण्यासाठी आज दुपारी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.