शरद पवार म्हणाले, “मागील वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटसाठी जागा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनांची त्यांनी अद्याप पूर्तता केली नाही. जे मुख्यमंत्री आश्वासनांचा शब्द पळत नाहीत अशांसोबत संघर्ष करण्याचे काम या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे आता हे मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील. आपलं सरकार आता जालना येथे निश्चितपणे ऊस संस्था उभारेल.”
ऊस उत्पादक कारखान्याला आपण सन्मानित केले आहे. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. कारण यापूर्वी देशात आपण साखर उत्पादनात क्रमांक एक वर होतो. आता उत्तर प्रदेश क्रमांक एक वर असून आपण दुसर्या क्रमांकावर आलो आहोत, असे होता कामा नये. या स्पर्धेत जर कोणी आपल्या पुढे जात असेल तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण दर एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे पवार उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
३१ जानेवारी २०१९ रोजी जागतिक ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली. तसेच या परिषदेला अनेक देशांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही परिषद नक्की कुठे होईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही. यावेळी काही निवडक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील देखील उपस्थित होते.