नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. तसंच त्यांनी शेतकरी, तरुणांना ‘पाणी वाचवा’ असं आवाहन केलं. दिल्लीच्या विज्ञान भवनात त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल भूजल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोदी यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. ‘या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात येईल. तसंच ज्या भागांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे किंवा वेगाने घट होत आहे, अशा भागांत विशेष लक्ष दिले जाणार आहे,’ असं मोदी यांनी सांगितलं. यावेळी मोदी यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली. हिमाचल प्रदेशला लेह-लडाखशी जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याला ‘अटल बोगदा’ असं नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. हा बोगदा सुरक्षेसह पर्यटनाच्या दृष्टीनंही महत्वाचा आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या स्वप्नांना त्यांच्या नावाशी जोडण्याचं भाग्य मला लाभेल याचा विचार मी कधीही केला नव्हता, असं मोदी म्हणाले.