सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका परदेशी विद्यार्थ्याला प्रशासनानं देश सोडून जाण्यास सांगितलं आहे. जॅकब लिंडेथल असं या विद्यार्थ्याच नाव असून, तो जर्मनीचा नागरिक आहे. जॅकब आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेत आहे. नागरिक नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात जॅकब सहभागी झाला होता. त्यानंतर त्याला प्रशासनानं देश सोडून मायदेशी जाण्यास सांगितलं आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
दिल्लीतील जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केल्यानंतर देशभरातील नामांकित शैक्षणिक संस्थामधून त्याला समर्थन देण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या काळात आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेणारा जॅकब सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनातील त्याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. यानंतर लगेचच त्याला भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. जॅकबने सीएए आणि एनआरसी या कायद्यांची नाझी राजवटीशी तुलना केली होती.
जॅकबसोबत झालेल्या घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनावर टीका केली आहे. यासंदर्भात आंबेडकर यांनी ट्विट केले असून, “जॅकबला देश सोडून जाण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करीत आहोत. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात शांततापूर्ण मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला, हीच त्याची चूक आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचं नाव उघड करायला नको होतं. कल्पना करा जर पाश्चिमात्य देशांनी असंच भारतीय विद्यार्थ्यांसोबत केल तर…?,” असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.