जळगाव – रेल्वेतर्फे सुरू असलेल्या जळगाव-मनमाड तिसर्या रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता हे घेणार असून यासाठी उद्या दि. 24 रोजी ते व्हीसीद्वारे जिल्हाधिकार्यांकडून माहिती घेणार आहेत. जळगाव ते मनमाड दरम्यान तिसर्या रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलो मीटरच्या कामाला यंदा मे महिन्यात सुरुवात केली आहे. मात्र या साडेअकरा किलो मीटरच्या मार्गावर ज्या शेतकर्यांच्या जमिनी येत आहेत त्या शेतकर्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी भूसंपादनाला विरोध दर्शविला आहे. तसेच पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील रेल्वे मार्गालगत असलेल्या शेतकजयानी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार पाचोरा व चाळीसगाव येथील प्रातांधिकार्यांनी या शेतकर्यांसोबत चर्चा देखील केली. मात्र, यातून अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. परिणामी रेल्वेच्या हद्दीतच तिसर्या लाईनचे काम सुरु असून इतर ठिकाणचे काम रखडले आहे. तसेच दुसरीकडे भादली ते जळगाव या तिसर्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी तरसोद व असोदा येथील बागायतदार व निम बागायतदार शेतकर्यांच्या जमिनीला ज्याप्रमाणे भाव दिला आहे त्याप्रमाणे आमच्यादेखील जमिनीला भाव द्यावा, अशी मागणी येथील शेतकर्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. तर शेतकर्यांनीही तरसोद-असोदा येथील शेतकर्यांप्रमाणे आमच्या जमिनींना मोबदला दिल्यावरच तिसर्या मार्गासाठी रेल्वेला जमिनी देणार असल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.