नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे.
राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘मोदी आणि शहा यांनी तुमचं भविष्य नष्ट केलं आहे. नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून तुमच्या मनात असलेल्या रागाला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची धूळधाण केल्याबद्दलच्या तुमच्या संतापालाही ते सामोरे जाऊ शकत नाहीत. म्हणून ते आपल्या देशात दुही माजवत आहेत आणि तुमच्या मनातल्या त्या तिरस्कारापासून पळ काढत आहेत.
राहुल पुढे असंही म्हणतात की ‘आपण केवळ देशातल्या प्रत्येक भारतीयाप्रति प्रेमाची भावना ठेवूनच त्यांचा प्रतिकार करू शकतो.’ काँग्रेसच्या महासचिव आणि राहुल यांची बहीण प्रियांका यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल यांनी हे ट्विट केले आहे.