कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी, पुन्हा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यावर तोफ डागली आहे. अमित शहा हे केवळ भाजपचे नेते नाहीत, तर या देशाचे गृहमंत्री देखील आहेत. मात्र, त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ नाही केला, पण ‘सबके साथ सर्वनाश’ केला आहे, असा घणाघात त्यांनी केला.’नागरिकत्व कायदा आणि एनआरसी मागे घ्या, अन्यथा तुम्ही येथे ते कसे लागू करता हे मी बघतेच, अशा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला.
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी, कोलकातामधील एका जाहीर सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘नागरिकत्व कायदा आणि एनआरसी मागे घ्या, अन्यथा तुम्ही या राज्यात ते कसे लागू करता हे मी बघतेच,’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. भाजप संपूर्ण देशाला ताब्यात घेऊन पाहत आहे. पण आम्ही तसं होऊ देणार नाही. अमित शहा म्हणतात की, आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही, मग तुम्ही आधार कार्डसोबत सर्व काही का जोडत आहात, असा सवालही त्यांनी केला.