रांची – नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘हिंमत असेल तर पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला भारताचं नागरिकत्व देण्याची घोषणा करावी, असं आव्हान मी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना देतो,’ असं मोदी म्हणाले. झारखंडच्या बरहेटमधील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
नागरिकत्व कायद्याला काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. तर उत्तर भारतासह ईशान्येकडील काही राज्यांत या कायद्याला विरोध करण्यासाठी नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. या कायद्याला तीव्र विरोध होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेतून काँग्रेससह विरोधी पक्षांना लक्ष्य केलं आहे. ‘तुमच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्याची घोषणा करावी असं मी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना आव्हान देतो. देश त्यांचा हिशेब चुकता करेल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करून दाखवा, तिहेरी तलाकविरोधी जो कायदा केला आहे, तो रद्द करा, असंही असंही मी आव्हान देतो,’ असं मोदी म्हणाले.