बाळाचे आई-वडील गाढ झोपले असताना ६ महिन्याच्या बाळाला उंदराने शरीरावर ५० पेक्षा जास्त ठिकाणी कुरतडून जखमा केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली असल्याचं समजते अमेरिकेतील इंडियानामधील ही घटना आहे.
आई – वडिलांना पोलिसांनी केली अटक
६ महिन्याच्या बाळाला उंदीरने चावा घेऊन घायाळ केल्याचे लक्षात आल्यानंतर बाळाच्या वडिलांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी बाळाचे वडील डेविड आणि आई एंजल स्कोनाबॉम यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत राहणाऱ्या मावशीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या जोडप्याला तीन अपत्य आहेत.
बाळाच्या उजव्या हाताची चार बोटे आणि अंगठा गायब
पोलीस कर्मचारी जेव्हा घरी पोहचले तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला,पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांना एक ६ महिन्यांचा मुलगा रक्ताने माखलेला दिसला.उंदराच्या चाव्याच्या ५० पेक्षा जास्त ठिकाणी जखमा होत्या. पोलीस डिटेक्टिव्ह जोनाथन हेल्म यांनी मुलाच्या उजव्या हाताची चार बोटे आणि अंगठा गायब असल्याचे म्हटले आहे. बाळाच्या बोटांची हाडे दिसत होती. दरम्यान बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार घेण्यात येतं असून बालक जिवंत आहे.
इतरही दोन मुलांच्यां पायाची बोटे खाल्ल्याचं वृत्त
या घरात उंदराने लहान मुलाला चावण्याची ही पहिलीच वेळ नसून सप्टेंबरमध्ये घरातील इतर मुलांनाही चावा घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आले आहे. घरातील दोन मुलांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांना १ सप्टेंबर रोजी उंदरांनी त्यांच्या पायाची बोटे खाल्ल्याचं सांगितलं होतं त्यावेळी मुलं झोपली होती. घरात उंदीरांच्या बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात आले होते असे बाळाच्या वडिलांनी पोलिसांनी सांगितलं आहे.

