गडचिरोली : राज्याच्या एसटी महामंडळाच्या अनेक लालपरीची दुरावस्था झाली आहे. अशातच राज्याच्या लालपरी बसचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसेसच्या प्रश्न ऐरणीवर आला. व्हिडिओमध्ये या बसच्या वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडलेल्या अवस्थेत हवेत उडताना दिसत होते.
या प्रकरणाची दखल महामंडळाने घेतली असून नादुरुस्त बस सेवेसाठी काढल्याने गडचिरोलीचे विभाग यंत्र अभियंत्यांना महामंडळाने अखेर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच 40 वाय 5494 ही बस गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या बसच्या वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडलेल्या अवस्थेत हवेत उडताना दिसत होते.
एसटी महामंडळाने गडचिरोली यंत्र अभियंत्यांना केले निलंबित, छप्पर उडालेली एसटी सेवेत pic.twitter.com/AK7dcP1DwQ
— Atul B. Kamble (@atulkamble123) July 27, 2023
अशा धोकादायक स्थितीत बस चालवितानाचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने महामंडळाच्या परिस्थिती विषयी जनसामान्यांमध्ये चर्चा सुरु झाली होती. विशेष मध्ये अशा बिकट अवस्थेत या बसमधून प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
या नादुरुस्त बसच्या दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेत विहीत वेळेत न केल्याने संबधीत विभागाचे यंत्र अभियंता शी.रा.बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे. जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करण्यास त्यांना जबाबदार धरुन पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित केल्याचे महामंडळाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

