मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २२ वर्षे जिथे वास्तव्य केले ते परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे १९१२ ते १९३४ असे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात विद्वान व महामानव म्हणून प्रसिद्धीस पावले. त्यांच्या जीवनात या वास्तूचे खूप महत्त्व होते. बीआयटी चाळ क्रमांक १ मधील या दोन खोल्यांमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील हा एतिहासिक वास्तूरूपी अमूल्य ठेवा जतन करावा आणि त्या ठिकाणी यथायोग्य स्मारकाची निर्मिती करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आज हा निर्णय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मागणीची पुर्तता केली.