नवाडा : बिहारच्या नवाडा जिल्ह्यात राहणाऱ्या पतीनं त्याच्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. महिलेच्या पतीनं घेतलेल्या निर्णयानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण पती त्याच्या निर्णयावर ठाम राहिला.
घडलं असं की महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी महिलेनं रात्री उशिरा तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. मात्र महिलेच्या सासरच्या मंडळींनी दोघांना पकडलं. त्यानंतर ग्रामस्थ जमले. ग्रामस्थांनी महिलेच्या प्रियकराला मारहाण केली. दोघांना पकडून ठेवलं. घटनेची माहिती मिळताच महिलेचा पती घरी परतला. त्यानं दोघांना जवळच्या मंदिराला नेलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं.
पतीच्या या निर्णयानं ग्रामस्थांना धक्काच बसला. मात्र पती त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात महिलेचा पती तिचा विवाह प्रियकरासोबत शिव मंदिरात लावून देताना दिसत आहे. प्रियकरानं विवाहित प्रेयसीच्या कपाळावर कुंकू लावत तिचा स्वीकार केला.