मुंबई : राज्यावर चक्रीवादळाचं संकट ओढवलं आहे. पूर्वमध्य व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर मंगळवारी संध्याकाळी चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले असून पुढील २४ तासांत “बिपोरजॉय” पूर्वमध्य अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता. यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.
राज्यात ४ जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला असून पुढील काही तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु हा पाऊस मान्सून नाही, यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी घाई करु नये. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. जसं जसं हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसा पुढील १२ तासांत त्याचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमध्ये कधी येणार मान्सून
मान्सून अजून केरळमध्ये दाखल झालेला नाही. दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये येतो. यावर्षी ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. आता 8 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि दक्षिण केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाला असला, तरी पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवाहाला अजूनही अपेक्षित जोर आणि उंची प्राप्त झालेली नाही.