नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. मुलीचं अपहरण झाल्याच्या तासाभरातच आई-वडिलांनी रेल्वेखाली गोदान एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीकडे लग्नासाठी तगादा लावत अपहरण करण्यात आलं. मुलीचं अपहरण झाल्याने तणावाखाली येऊन मुलीच्या आईवडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या (Nashik) देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
रविवारी दुपारी एकच्या सुमारास तरुणी ही आपल्या आई वडिलांसोबत दुचाकीवरुन प्रवास करत असताना, चारचाकीतून आलेल्या तरुणाने आपल्या साथीदारांसह तरुणीचं अपहरण केलं. तसंच आई-वडिलांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. मुलीचं अपहण आणि तरुणाचा लग्नासाठी तगादा, या सततच्या त्रासाला कंटाळून आई- वडिलांनी भगूर नानेगाव रेल्वे ट्रॅकवर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली.
दरम्यान, सिन्नर पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनूसार अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समाधान जनकर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून मुलीचा आणि आरोपींचा शोध सुरू आहे.हे प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे