जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, जळगावमार्फत बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे 24 ते 26 मार्च, 2023 दरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत यशोदाई हॉल, रिंग रोड, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यलयामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 24 मार्च, 2023 रोजी दु. 3.00 वा. खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया असतील. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ विद्या गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक (आत्मा) कुर्बान तडवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ वनिता सोनगत, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ हेमंत बाहेती, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) मनोहर चौधरी, संदीप मराठे, विभागीय संसाधन व्यक्ती, माविम, नाशिक विभाग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गट उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिलांमध्ये विक्री कौशल्य विकसित व्हावे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. प्रदर्शनात बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी असतील तसेच त्यामध्ये PMFME अंतर्गत व इतर योजनांमधील गटांना स्टॉल देण्यात येणार आहे. प्रदर्शनात खान्देशी मसाले, विविध प्रकारचे तांदूळ पापड, नागली पापड, बिबड्या, कुरड्या, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, गारमेंट, हस्तकला वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर तृणधान्याचे महत्व सर्वसामान्यांना कळावे यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणीयुक्त पदार्थ, राजगिरा यांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात येणार आहे. प्रदर्शनात आरोग्य विषयक माहिती सुद्धा देण्यात येणार असून सांस्कृतिक व जाणीव जागृतीचे कार्यक्रम होणार आहे.
तरी नागरिकांनी प्रदर्शनास भेट देवून बचत गटामार्फत निर्मित शुद्ध व दर्जेदार उत्पादन खरेदीचा आनंद घ्यावा. असे आवाहन व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यलय, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.