जळगाव : भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बोचरी टीका केलीय. शिवसेनेची गत आता ‘काय होतास तू.. काय झालास तू?’, अशी झाली आहे असा टोला हाणला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणानंतर झालेल्या माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
उद्धव ठाकरेविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाली, शिवसेना पक्ष गेला, चिन्ह गेले. यामुळे ठाकरे काहीही बोलताहेत. जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोनाचे कारण सांगून घरात बसून होते. तेव्हा महागाई दिसली नाही. आता महागाईविरोधात ओरडत फिरताहेत. त्यांना शिवसेनेने पक्षातून ढकले आहे. आता शिवसेना शिंदे गटाची आहे. चिन्हही त्यांना मिळाले आहे. ४० आमदार त्यांना सोडून गेले. त्यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे. यामुळे त्यांचा तोल यापुढील काळात अजून सुटेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर देखील टोला लगावला आहे.
आमदार खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, मद्यविक्रीबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडली. पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातून अवैध धंदे करणाऱ्यांना पकडून आणले. त्यावर पोलिसांना खडसे यांनी तत्काळ फोन करून, ‘तुम्ही आमच्या माणसांना पकडले आहे’, असे विचारत त्यांच्यावर दबाब टाकला. म्हणजे एकीकडे अवैध धंद्यावरून लक्षवेधी मांडायची आणि पोलिसांनी कारवाई केली, की त्यांना फोनवरून धमकी द्यायची, हा कोणता प्रकार आहे? हे कसले लोकप्रतिनिधी आहेत; असा टोला गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लगावला.

