मुंबई : राज्यात भाजपसोबत फारकत घेत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होते. मात्र, महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. पुन्हा भाजपसोबत युती करणार होते, या संदर्भात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठकही झाली होती. पण त्यांनी ऐनवेळेला निर्णय फिरवला, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजपपासून लांब जाणं उद्धव ठाकरे यांना स्वत:ला आवडलेलं नव्हतं. पुन्हा युती करण्याची त्यांनी वचनं दिली होती. तरीही युती केली. मग तुम्ही कुणावर आरोप करत आहात? मला हे माहीत आहे. कारण मी स्वत: हे घडवून आणलं होतं. त्यावेळी पंतप्रधान भेटही देत नव्हते. तेव्हा तुमची पंतप्रधानांशी भेट घडवून आणली. तुमची तिथे बोलणीही झाली. घडलेलं चुकीचं आहे.
हे सुधारलं गेलं पाहिजे, अशी कबुली तुम्ही दिली होती. हे तुम्ही लोकांना का सांगत नाही? तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. पुन्हा भाजपसोबत युती करणार होते, असं दीपक केसरकर म्हणाले.
मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं कबूल करून उद्धव ठाकरे दिल्लीहून आले होते. मुंबईत गेल्याबरोबर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, असं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं होतं. पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा मागितला नव्हता. तुम्हाला वाटेल तेव्हा राजीनामा द्या असं मोदी म्हणाले होते.