मुंबई : राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत मोठी बातमी समोर आलीय. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पुढील महिन्यात म्हणजेच ९ मार्च रोजी सादर होणार आहे. प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे
२७ फेब्रुवारीपासून ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार आहे. सध्या राज्यमंत्रीमंडळाचा विकास झालेला नाही. त्यामुळे वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नाहीत. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मार्च महिन्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता.
मात्र आता तसे न झाल्यास शंभूराज देसाई, दिपक केसरकर यांपैकी कोणी एक राज्याचा अर्थसंकल्प सादर करू शकतात. ८ मार्च रोजी आर्थिक पाहणीचा अहवाल सादर केला जाणार आहे.त्यानंतर ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सारद केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
तसचे आता समोर येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील टीका होत आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा अर्थसंकल्प आगामी निवडणुका लक्षात घेऊन केला जाणार तसेच नागरिकांसाठी महत्वाचे असलेले सिंचन, ऊर्जा, वैद्यकीय, शिक्षण याकडे दुर्लक्ष केले जाणार असं विरोधक म्हणत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

