जळगाव : खावटीची एकरक्कमी रक्कम जमा करण्यासाठी तारीख वाढवून देण्यासाठी तक्रारदाराकडून २०० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कौटूंबीक न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षक हेमंत दत्तात्रय बडगुजर (५७, रा. इंद्रप्रस्थ नगर) याला गुरूवारी रंगेहाथ पकडले. सहाय्यक अधीक्षकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यामध्ये कौटूंबीक वाद आहे. त्यामुळे त्यांनी बी.जे.मार्केट येथील कौटूंबिक न्यायालयात पत्नीने त्यांच्याकडे नांदावयास यावे म्हणून दावा दाखल केला. पत्नीने देखील तक्रारदार यांच्याविरुद्ध त्याच न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला. सदर दाव्यात कौटुंबीक न्यायलयाने तक्रारदार यांना ८५ हजार रुपये एकरक्कमी खावटी रक्कम देण्याचा आदेश दिला. दरम्यान, खावटीची एकरक्कमी रक्कम जमा करण्यासाठी तारीख वाढवून मिळवून देण्याच्या मोबदल्यात कौटूंबीक न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक हेमंत बडगुजर याने तक्रारदार यांच्याकडे २०० रूपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर गुरूवारी तक्रारदाराकडून २०० रूपयांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षकाला कौटूंबिक न्यायालयाच्या वरच्या मजल्यावरील कॅन्टीनजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, सुरेश पाटील, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, ईश्वर धनगर, सचिन चाटे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली आहे.