अति घाई संकटात नेई, अश्या प्रकारचे फलक बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतात. आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की धावती ट्रेन पकडू नका, पण लोकांना कितीही सांगितलं तरी ते काही ऐकतं नाही. लोकं लवकर पोहोचण्यासाठी जीवाची परवा न करता धावती ट्रेन पकडतात. अशातच धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ जालना रेल्वे स्थानकावरील आहे. त्यात धावत्या रेल्वेत बसण्याचा प्रवाशाचा प्रयत्न फसला आणि ताे रेल्वेच्या रुळावर पडणार ताेच त्याला आरपीएफचे जवानाने जीवाची पर्वा न करता वाचवले. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी – शुक्रवारी जालना रेल्वे स्थानकावर पुणे-नांदेड एक्सप्रेस निर्धारित वेळेत आली. जालना स्थानकावरुन नांदेडसाठी रेल्वे रवाना हाेताना एका प्रवाशाने चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला. प्रवाशाचा तोल गेल्याने तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला.
ही बाब या ठिकाणी कर्तव्य बजावत असणाऱ्या आरपीएफचे जवान आसाराम झुंजरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तडक प्रवाशाकडे धाव घेतली. दुस-या बाजूने झुंजरे यांच्या मदतीला एक प्रवासी धावून आला. दाेघांनी जीवाची पर्वा न करता रेल्वेखाली जाणार्या प्रवाशाला ओढून बाहेर काढले. या घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी जवान झुंजरे आणि प्रवाशाचे अभिनंदन केले. या घटनेबद्दल साम टीव्हीशी बाेलताना झुंजरे म्हणाले पुणे ते नांदेड ही एक्सप्रेस सकाळी पावणे आठ वाजता जालना रेल्वे (railway) स्थानकात आली. पाच मिनिटांचा कालावधी झाल्यानंतर रेल्वे नांदेडला रवाना हाेत हाेती.