मुंबई : ठाकरे गटात सुरु असलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसून अशातच आज मुंबईच्या दहिसर भागातील काही स्थानिक पदाधिकारी आणि नेते मंडळींनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे वॉर्ड 12 चे शाखाप्रमुख राजेंद्र पवार, उपशाखाप्रमुख पंकज मसुरकर आणि दीपक आचरेकर सोबत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आज शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. मात्र ही युती ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना मान्य नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटातून पुन्हा एकदा पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडताना दिसत आहेत. काल देखील महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.