मुंबई, दि. 26 : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.
पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट वे ऑफ इंडिया येथे २६/११ हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यासह देशाच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वार झालेला हल्ला आहे. हा हल्ला परतविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दलातील वीर शहिदांप्रती सहसंवेदना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आज आपण मोठ्या संख्येने येथे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत, असे ते म्हणाले.
ज्या समाजात वीरांचा सन्मान होतो तोच समाज प्रगती करतो. पोलीस, सुरक्षा कर्मचारी आपले कर्तव्य अविरतपणे बजावत असतात. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही समाजात वावरतांना अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत सुरक्षिततेच्यादृष्टिने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. या निमित्ताने आपण सर्वजण सदैव सतर्क राहण्याचा निर्धार करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केले.