मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे आधीचे टीकेचे धनी बनलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कोश्यारी यांनी चप्पल घालून 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपालांवर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात आज 14 वर्ष पूर्ण झाली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून शहिदांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चप्पल काढून शहिदांना अभिवादन केले. तर दुसरीकडे राज्यपालांनी थेट चप्पल घालून शहिदांना अभिवादन केल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.
अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते pic.twitter.com/7Ujwgtuv4x
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 26, 2022
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, असा टोलाही सावंत याणी लगावला आहे.