जळगाव : शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. मात्र यानंतर विरोधकांनी 50 खोक्यांच्या मुद्द्यावरुन शिंदे गटावर वारंवार निशाणा साधण्यास सुरुवात केली. यादरम्यान आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकू, असा इशारा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या आमदारांमुळेच खोक्यांचा विषय हा जनतेपर्यंत पोहोचला. त्यामुळे खोके घेतले किंवा नाही घेतले हे पुराव्यानिशी देणं हे अत्यंत अवघड आहे. मग मानहानीचा दावा कशासाठी? असा प्रश्नदेखील राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच खोके घेतले म्हणजे तुम्ही पैसे घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही असेदेखील ते म्हणाले. त्यामुळे मानहानीची नोटीस दिल्यास सत्य जनतेच्या समोर येईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांच्याकडून देण्यात आली आहे.