मुंबई : सध्या राज्यात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चांना उधाण आलंय. यावरूनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महदळभद्री प्रयोग आहे, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून शिंदे गटाच्या नेत्यांना सुनावण्यात आलं आहे.
तसेच या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल, असा इशाराही शिवसेनेने सामनाच्या संपादकीय मधून दिला आहे.
काय म्हटलेय अग्रलेखात?
अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड्या मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेस ते शोभणारे नाही. या अब्दुल सत्तार यांच्या एका गलिच्छ, बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या सुविद्य कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना या अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली, असे संपादकीयमध्ये म्हटले आहे.