मुंबईः हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात मोठं आंदोलन केलं. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहे.
हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना राज ठाकरे दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाणही करण्यात आल्याचं वृत्त आहे. या आंदोलनानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला. खरी शिवभक्ती काय असते, ते राज ठाकरे यांच्याकडून शिका, असा टोला त्यांनी लगावला.
हे सुद्धा वाचा..
लग्नसराईत सोन्या-चांदीचे भाव वाढले, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर
राज्यात ‘या’ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर..
त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. त्यामुळे या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र आहे.
आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून या चित्रपटावर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या डोक्यातून जात अजिबात जात नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली.त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना सध्या या विषयावर भाष्य करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.