जळगाव :महागाई सर्वसामान्यांची पाठ काही सोडत नाहीय.गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालं. या नुकसानीचा फटका खाद्य तेलाच्या किंमतीवर झाला आहे. घरगुती तेलाच्या किंमतीमध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस खाद्यतेलांच्या किमतीत घसरण झाली होती. त्यावेळी खुले तेलाचा एक किलोचा दर 130 रुपयांपर्यंत आले होते. मात्र
ऐन सणासुदीत खाद्यतेलांच्या किमतीत वाढ दिसून आली. कारण गेल्या महिनाभरात राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झाले. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाले. सोयाबीनला याचा मोठा फटका बसला. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी तेलाची भाववाढ कमी करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून आयात शुल्क हटवण्यात आले होते. त्यामुळे मलेशियातून पामतेलाची आयात सुरु झाली आणि बाजारपेठेतील भाव कमी झाले.
सरकीच्या तेलाचे ही भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. तर भविष्यात करडईच्या तेलाची ही भाव वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन तेलाचे भाव यापूवी 130 होते ते आता 140 ते 1450झाले आहेत. पाम तेलाची किंमत 100 वरून 110, वनस्पती तुपाची किंमत 125 वरुन 130 ते 1400, सरकीच्या तेलाची किंमत 145 ते 150, सूर्यफुलाच्या तेलाची किंमत 155 वरुन 170 तर शेंगदाणा तेलाची किंमत 180 ते 185 झाली आहे.