मुंबई: राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली जात असताना उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठे भाकीत वर्तवलं आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? याची जोरदार चर्चा रंगली आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात, असंही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगितल्याचं समजतं.