मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष कोणत्या वळणावर पोहोचणार याबाबत ताणली गेलेली उत्सुकता सर्वोच्च न्यायालयाने आज (1 नोव्हेंबर) पुन्हा एकदा कायम ठेवली. राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले.
घटनापीठाने दिलेल्या निर्देशानुसार ही सुनावणी आता चार आठवड्यांनंतर म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर कोर्टात आता ‘तारीख पे तारीख’ सुरु झाल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, दोन्ही पक्षकारांनी दिलेल्या मुदतीत आपले म्हणने लिखीत स्वरुपात सादर करावे. तसेच, घटनापीठासमोर नेमके कोणते वकील बाजू मांडतील याबाबतही माहिती द्यावी, असे कोर्टाने पक्षकारांना बजावले. कोर्टाने सांगितले की, दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील आपली बाजू न्यायालयात मांडू शकतात. शिवाय पक्षकारांनी आपले म्हणने थोडक्यात, संयुक्तीक आणि मोजक्या मुद्द्यांसह मांडावेत. आवश्यकता भासल्यास दोन्ही गटांनी एक बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत आणि त्याचा उल्लेख आपल्या लिखीत बाजूत करावा, असेही न्यायालयाने सुचवले.
पक्षकारांनी आपले मुद्दे लिखीत स्वरुपात मांडल्यास कोर्टाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास अधिक मदत होते. शिवाय वेळेचा अपव्ययही टाळला जातो,याकडे कोर्टाने लक्ष वेधले. त्यामुळे दोन्ही पक्षकारांच्या वतीने कोणते वकील कोर्टात बाजू मांडणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.