मुंबई – महाविकास आघाडी सरकार कोसल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले होते. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. मात्र त्यामध्ये मोजक्याच आमदारांना स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शिंदे सरकारचा दुसरा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाच्या पूर्वी होणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये शिंदे गटातील चार आमदारांना, तर भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, नाराज असल्याच्या चर्चा होत्या अशांना या विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र कोर्टकचेरीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये पहिला विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही गटातील प्रत्येकी ९ जणांना संधी मिळाली होती. पहिल्या विस्तारात शिंदे गटातील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे काही नेते नाराज झाले होते. या नेत्यांना आता संधी मिळू शकते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे. याशिवाय भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रकाश आबीटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम यांचीही नावं चर्चेत आहेत.
हे पण वाचा..
रोज रिकाम्या पोटी 4 तुळशीची पाने चावा, मधुमेहासह हे 5 आजार होतील दूर
शेतकऱ्यांना दरमहा मिळते 3000 रुपये पेन्शन, या योजनेचा असा घ्या लाभ??
ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलेले आणि शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिपद मिळणं फिक्स मानलं जात आहे. मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे पुढच्या १५ ते २० दिवसात विस्ताराची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात कॅबिनेटबरोबरच राज्यमंत्रीपदेही भरण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भाजपमधून कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारतीय जनता पक्षातून मंत्रिपदाच्या शर्यतीत कोण आहे, या नावांची चर्चा सुरु झालेली नाही. भाजपातही अनेक इच्छुक असले, तरी तूर्तास सर्वच जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत.