जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जवळपास 18 तास पोलीस ठाण्यात आंदोलन केलं होतं. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांना असलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कादायक दावा केला आहे.
महाजन यांचा काय आहे दावा?
एकनाथ खडसे हे त्यांच्या सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.
जळगाव जिल्हा दूध संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी खडसेंनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं होतं. हे आंदोलन जवळपास 18 तास चाललं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत खडसेंना आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. खडसेंच्या या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने खडसेंच्या विरोधात कठोर पाऊल उचललं.
राज्य सरकारने खडसेंना देण्यात आलेली वाय प्लस दर्जीची सुरक्षा काढून घेतली. खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे या कारवाईनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर गंभीर आरोप केला आहे.