जळगाव : राज्यात सुरु असलेल्या शिवसेनेमधील अंतर्गत वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भानगडीमध्ये बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली, अशी टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे आपला मित्रपक्ष मजबूत असला, तर आपणसुद्धा मजबूत असू शकतो. महाविकासआघाडीमधला घटक मजबूत असला पाहिजे, असे वक्तव्य केले.
तीन पक्ष मिळून सरकार स्थापन होऊ शकतं हे शरद पवार यांनी दाखवून दिलं. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्या, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे 54 आमदार होते, तर शिवसेनेचे 56 आमदार होते. राष्ट्रवादीचे एक-दोन आमदार जास्त असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता. दोन-तीन आमदारांमुळे किती फरक पडू शकतो, हे यावरून समजते. राष्ट्रवादी मजबूत करून पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
2019 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपने 105, शिवसेनेने 56, राष्ट्रवादीने 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युतीमध्ये निवडणुका लढून बहुमत मिळवले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले, यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकासआघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर या सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांसह बंड केले आणि हे सरकार कोसळले.