जळगाव, दि.१२ (प्रतिनिधी) :- शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच रु. १००/- मात्र या दराने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या ६.२०,६५० शिधापत्रिकांसाठी दिवाळी शिधाजिन्नस संचाची मागणी शासनाकडे नोंदविणेत आली आहे. या जिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविणेत येतील. रास्त भाव दुकानांमार्फत या शिधाजिन्नसांचे वाटप करणेत येईल. सदर वाटप हे ई- पॉस मशिनव्दारे करण्याचे शासनाच्या सूचना आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानातून सदर दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. प्रति शिधापत्रिका शिधाजिन्नसांचा एक संच देय राहील ज्यामध्ये १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेलाचा समावेश असेल. प्रति संच किंमत रु. १००/- मात्र राहील याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. शिधापत्रिकाधारकांनी पुर्ण दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. या संचामधील वस्तू सुटया करुन वाटू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी या दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्य पत्रकान्वये केले आहे.