जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आज पोलिसांनी छापेमारी केली. यात ६ तरुणी, महिलांसह ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली.
याबाबत असे की, शहरातील गोलाणी मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक विजय ठाकूरवाड यांना मिळाली होती. त्यांनी या प्रकरणी कारवाईसाठी सपोनि दत्तात्रय पोटे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.
या पथकातील पोलीस कर्मचारी हे डमी ग्राहक बनून संबंधीत कुंटणखान्यात गेले. यानंतर आज बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू होता. पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणी, महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
जळगाव शहरात अवैध कुंटनखाने अनेक ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असून पोलीस दादा सोपस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला होता.