नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात लोकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. दिवाळीच्या आधी साबण कंपन्यांनी साबणाच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. कच्च्या मालाच्या दरात घट झाल्यामुळे कंपन्यांनी काही साबणांच्या किमती कमी केल्या आहेत. साबणाच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. किंमती कमी झाल्यामुळे या उत्पादनांची विक्री दुसऱ्या सहामाहीत वाढू शकते.
लाइफबॉय आणि लक्सच्या किमती कमी झाल्या
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने त्यांच्या लोकप्रिय साबण ब्रँड लाइफबॉय आणि लक्सच्या किमती कमी केल्या आहेत. या दोन्ही साबणांच्या किमतीत 5 ते 11 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. ही कपात पश्चिम विभागात करण्यात आली आहे. त्याच वेळी, गोदरेज ग्रुपच्या युनिट गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सने आपल्या साबण ब्रँड गोदरेज नंबर-1 च्या किमती 13 ते 15 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. किमतीतील कपातीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात विक्रीत वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या देशातील किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर ७ टक्क्यांवर होता. सप्टेंबर महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे. पामतेल आणि इतर कच्च्या मालाच्या जागतिक किमतीत घसरण हे साबणाच्या किमती कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीएफओ समीर शाह म्हणाले, “उत्पादनाच्या किमती कमी केल्यामुळे, किमतीतील कपातीचा फायदा ग्राहकांना देणारी GCPL ही पहिली FMCG कंपन्यांपैकी एक आहे.”
गोदरेज नंबर-1 पॅक कितीमध्ये मिळेल?
ते म्हणाले, ‘विशेषतः जीसीपीएलने साबणांच्या किमती १३ ते १५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आम्ही गोदरेज नंबर-1 साबणाच्या बंडल पॅकची (प्रत्येकी 100 ग्रॅमची पाच युनिट) किंमत 140 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत कमी केली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की, “वेस्ट झोनमध्ये लाईफबॉय आणि लक्सच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. या साबण ब्रँडच्या किमती 5-11 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. प्रवक्त्याने सांगितले की, सर्फ, रिन, व्हील आणि डव्ह सारख्या इतर ब्रँडच्या किंमतींमध्ये कोणतीही कपात केलेली नाही.
महागाईने समस्या वाढल्या
FMCG कंपन्यांना सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत उच्च किरकोळ महागाई आणि ग्रामीण भागात मंदीच्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या कंपन्यांनी ‘ब्रिज पॅक’चे उत्पादन वाढवले, ज्याची किंमत लोकप्रिय एंट्री-लेव्हल पॅक आणि मोठ्या पॅकमध्ये आहे.