मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की,आम्ही गद्दार नाही तर तुम्हीच गद्दार आहात, कारण तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली असून तुम्ही वैचारिक व्याभिचार केला आहे.आम्ही बाप पळविणारी टोळी असेल तर, तुम्ही बापाचे विचार विकणारी टोळी आहात असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.आम्ही गद्दारी केली नसून ‘गदर’ केला आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.तुम्ही म्हणता, भाजपने खंजीर खुपसला, तर शिवतीर्थावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत का शपथ घेतली. तेव्हा लाज वाटली नाही का?
बाळासाहेबांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी आम्ही भूमिका घेतली, ती लपून छपून घेतली नाही आमदार खासदारांचं ऐकूनच आम्ही उठाव केला, मात्र तो का केला, हजारो शेकडो पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा का दिला याचं आत्मपरिक्षण करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
शिवसेना उभारण्यासाठी आम्ही 40 वर्षे काम केलं, आंदोलनं केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. आता आम्हाला गद्दार म्हणता? बाळासाहेबांकडे बघून आम्ही गप्प बसलो. अडीच वर्षांपूर्वीच अनेक आमदारांनी सांगितलं होतं की ही आघाडी योग्य नाही. पण आम्ही सहन केलं. पण बाळासाहेबांचे विचार खु्ंटीला टांगल्यानंतर आम्ही गप्प बसणं शक्य नव्हतं.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “अडीच वर्षात अडीच तास तुम्ही मंत्रालयात गेला. आमदार आणि खासदार सोडून गेल्यानंतरही तुमचे डोळे उघडत नाहीत. चहावाला म्हणून तुम्ही ज्यांची खिल्ली उडवली ते कुठे आहेत आता याचा विचार करा. नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये भारताचं नाव केलं. या देशाचा पंतप्रधानाची तुम्ही टिंगल करताय? “असं म्हणत शिंदेनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं; आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा.
खरे गद्दार कोण? कोणी केली गद्दारी ?आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली.
शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे पाईक असलेल्या शिवसैनिकांना माझा नमस्कार. या विराट जनसमुदायला मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या समोर मी नतमस्तक होतो. या जनसमुदायाने सिद्ध केलंय की शिवसेना कुणाची
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी PFI वर घेतलेले निर्णय योग्य आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केलं आहे.
आरएसएसवर बंदीची मागणी हास्यास्पद, आरएसएसचं राष्ट्रउभारणीत महत्वाचं योगदान.
जरा विचार करा: तुमचे बंधू राज ठाकरे तुमच्या सोबत राहिले नाहीत. नारायण राणे सोडून गेले. स्मिता ठाकरे वाहिनी, निहार ठाकरे इथेच बसलेत. का बसलेत? आता तरी याचा विचार करा.
तुम्हांला मुख्यमंत्री म्हणून ५ वर्ष पूर्ण करायची होती. शिवसेनेचे होत असलेले पानिपत तुम्ही पाहत बसला होतात.
बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती. पण राजकारणात बाळासाहेबांनी कधी दोस्ती मध्ये आणली नाही.
एकीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होतं आणि आमचे पक्षप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका निभावत होते.
2.5 वर्ष का गप्पं बसलो? आमच्या देवाचं अंश तुम्ही म्हणून शांत बसलो.
आम्हाला रिक्षावाला, पानवाला म्हणणारे आता कुठे आहेत? चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला. तुम्ही त्यांची खिल्ली उडवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही खिल्ली उडवता. त्यांनी जगामध्ये आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण केलीय. जगातल्या लोकांना त्यांनी भुरळ घातली आहे.
काँग्रेस पक्ष आहे पण त्याला अध्यक्ष नाही, पंतप्रधानांची टिंगल करणाऱ्यांचं काय झालं?
आता तुमच्याकडचे लाखो शिवसैनिक गेले. आमदार गेले, खासदार गेले. तरी मी पणा कायम आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं.
दाऊद आणि याकुब मेनन चे हस्तक होण्यापेक्षा आम्हाला मोेदी शहांचे हस्तक व्हाय़ला केव्हाही आवडेल.
कटप्पा म्हणून ही टीका केली गेली. कटप्पा तर हा स्वाभिमानी, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता.
तुम्ही म्हणता, भाजपने खंजीर खुपसला, तर शिवतीर्थावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत का शपथ घेतली. तेव्हा लाज वाटली नाही का?