जळगाव : तमाशाच्या फडात नाचणे एका सहाय्यक फौजदाराला भोवले आहे. नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. भटू विरभान नेरकर असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना :
गेल्या महिन्यात निवृत्तीनगरात झालेल्या भावेश पाटील या तरुणाच्या हत्येने जळगाव हादरले होते. या प्रकरणी खेडी खुर्द येथील भूषण रघुनाथ सपकाळे आणि आव्हाणे येथील मनीष नरेंद्र पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील संशयित भूषण सपकाळे याच्या गावातील तमाशात सहाय्यक फौजदार भटू नेरकर हा आपल्या एका सहकार्यासह नाचला होता.
जळगाव: तमाशात पैसे उडवतानाचा पोलीस कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल; पोलीस कर्मचारी निलंबित. pic.twitter.com/1HXdVo6vLg
— Maharashtra Times (@mataonline) September 20, 2022
भटू विरभान नेरकर हे चक्क नृत्य करताना तसेच पैसे ओवाळताना दिसून आले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याच व्हिडीओत भूषण सपकाळे हा देखील नाचत असल्याचे दिसून आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.