जळगाव : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. दरम्यान, त्यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा समाचार घेतला. “हा कोण बकाले नावाचा माणूस, त्याला लाज, लज्जा, शरम आहे का नाय? असं म्हणत त्याला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे, त्याला दहा पिढ्या आठवण झाली पाहिजे, असं कधी करता कामा नये” असं अजित पवार म्हणाले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल देत निलंबनाचे आदेश पारित केले आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
“आपल्या जळगाव जिल्ह्यात कोण बकाले नावाचा माणूस आहे, त्याला लाज, लज्जा, शरम आहे का नाय? आमच्या महाराष्ट्रातील एकाही समाजाच्या बद्दल कोणाला काही बोलण्याचं कारण नाही, आम्ही काही असे तसे माणसं नाहीत, हे लक्षात ठेवा, त्या बकालेच्या बाबतीत, ज्या पद्धतीने तो मराठा समाजाच्या बद्दल आक्षेपार्ह पद्धतीने बोलला आहे, त्याला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे, त्याला दहा पिढ्या आठवण झाली पाहिजे, असं कधी करता कामा नये” असं अजित पवार म्हणाले.