जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
जिल्हा पोलीस दलात एलसीबीचा दरारा हा कुणापासून लपून राहिलेला नाही. जिल्ह्यात कुठेही कारवाई करण्याच्या विशेषाधिकारामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुखपद हे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. याच पदावर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कार्यरत असणारे निरिक्षक किरणकुमार बकाले यांची रात्री उशीरा अचानक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर, आता त्यांच्या जागी नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.