जळगाव, दि. 6 (प्रतिनिधी)- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या 17 व्या श्रद्धावंदन दिनी (स्मृतिदिन) जळगावसह कंपनीच्या भारतातील विविध आस्थापनांमधील सहकाऱ्यांनी कृतज्ञतेतून उत्स्फूर्तपणे 525 सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शिवाय कांताबाई जैन यांच्या स्मृतीदिनानिमित्त रिमांड होम, हरिजन सेवक संघ, बाबा हरिदास मंदीर, जय जलाराम मंदीर, मनोबल दीपस्तंभ फाउंडेशन विविध संस्थांमध्ये अन्नदान तर काही संस्थांमध्ये फळ वाटप देखील करण्यात आले.
स्व. कांताबाई यांच्या श्रद्धावंदन दिनी रिमांड होम येथे स्व. कांताबाईंच्या लहान जाऊबाई शकुंतला जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन यांच्या उपस्थितीत मुलांना मिष्टान्न देण्यात आले. जैन हिल्स येथील निवासस्थानी जैन परिवाराने सायंकाळी ‘नवकार महामंत्र जाप’ आयोजित केला होता. परिवारातील सर्व सदस्यांनी स्व. बाईंच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन केले.
समाजातील गरजू व्यक्तिंना रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 6 सप्टेंबर रोजी कंपनीत भव्य रक्तदान शिबीर आयोजिले जाते. अशाच पद्धतीचे रक्तदान शिबीर स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनी 9 मार्च ला देखील करण्यात येते. यात देखील सहकारी उत्स्फूर्त सहभागी होतात. सकाळी 08 ते सायंकाळी 6.30 पर्यंत चाललेले हे महारक्तदान शिबीराचे आयोजन भारतभरातील कंपनीच्या प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते.
यात जैन टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे 282, जैन अॅग्री पार्क, एनर्जी पार्क, फूड पार्क डिव्हाईन पार्क मिळून 161, उदमलपेठ 08, अलवर प्लांट 30 बडोदा 18, हैदराबाद प्लॅन्ट 26 असे 525 सहकाऱ्यांनी रक्तदान केले.
प्लास्टिक पार्क येथे कंपनीचे मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ सहकारी सी.एस. नाईक व श्रीयुत खारुल यांच्याहस्ते स्व.कांताबाई जैन यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान शिबीराचा शुभारंभ झाला. जैन फुडपार्क येथे स्व. भवरलालजी जैन यांचे मित्र सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांच्याहस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हील हॉस्पीटल आदी संस्थांनी रक्त संकलन केले.
स्व. कांताबाईंबद्दल परिचयात्मक संदर्भ
कौटुंबीक मराठी साहित्यातील लोकप्रिय पुस्तक ‘ती आणि मी’ सर्वांना परिचित आहे. सिद्धहस्त लेखक स्व. भवरलालजी जैन यांनी ते लिहिलेले आहे. त्यात त्यांनी पत्नी स्व. कांताबाईंच्या परिचयात्मक चार ओळींमध्ये सयोग्य परिचय करून दिलेला आहे….कालांतरानं ‘कांताबाई कोण होत्या?’ असं विचारणाऱ्यांनी पहावं, कांताबाई संस्कारित केलेल्या ‘ती आणि मी’ च्या गुण्यागोविंदाने एकत्रितपणे नांदत असलेल्या चार पुत्रांकडे, सुनांकडे, नात-नातींकडे, एव्हढंच नव्हे;तर सुखासमाधानाने प्रेमाच्या अदृष्य धाग्याने बांधल्या गेलेल्या भल्या मोठ्या विस्तारित जैन कुटुंबाकडे व सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या जैन उद्योगविश्वाकडे…’